परवा पार्ल्याला गेलो होतो. एका सेमिनारसाठी. दहावी बारावीत कमी मार्क्स मिळाले तर आपण आयुष्यात काय करू शकतो हा त्या सेमिनार चा विषय होता. मला मुंबई टाईम्सने रिपोर्टिंग करायला पाठवलेलं. मी तसा बोअरच होत होतो पण वक्त्याला वाईट वाटू नये म्हणून म्हणून माझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवण्याचा माझा केविलवाणा प्रयत्न होता. काही वेळानंतर एक वक्ते आय.टी. आय. ची माहिती द्यायला उभे राहिले. कमी शिकलेले लोक सुद्धा आज कसं चांगलं काम करतायत हे ते सांगू लागले. मी मात्र ह्याचा मला काय उपयोग असा विचार करत ते जी काही बडबड करत होते ते लिहून घेत होतो. मध्येच नतालीच्या कानात जोक्स सांगत होतो. सेमिनार संपल्यावर वक्त्याला चार शिव्या घालून आम्ही चालू पडलो.
जेवून खाउन आम्ही पुष्करच्या घरी टाईमपास करायला गेलो. 'त्या' भाषणाचा इफेक्ट आमच्यावर आणि खासकरून माझ्यावर इतका होता कि माझ्या प्रत्येक जोक मध्ये मी आय. टी. आय. चा पुरेपूर समावेश करत होतो. कोणी म्हणालं कि माझ्या प्रोफेशन चा मला कंटाळा आलाय कि मी लगेच म्हणायचो "आय. टी. आय. कर की!" पुष्कर च्या डोक्यात मात्र मोबाईल रिपेरिंग आणि टॉवर मेंटेनन्सचा कोर्स भारीच जागा करून बसलेला. तो पण जोक करत होता. आमचं खिदळणं खूप चालू होतं. पण थोड्या वेळाने पुष्कर म्हणाला की त्याला तो कोर्स खरच करायची इच्छा आहे. मी तर त्याला वेडात काढलं. म्हटलं पत्रकारितेचा कंटाळा आला तर मग दुसरं काहीतरी कर ना! मोबाईल रेपेरिंग काय!?!?!? पण त्यावर पुष्करचं जे उत्तर होतं ते मात्र माझ्या मनाला एक ठोसा मारून गेलं. पुष्कर म्हणाला "संदेश, एक विचार कर, आज समजा दुर्दैवाने तुला आई बाबांनी घराबाहेर काढला किंवा तुझ्या गां*त खाज म्हणून तुला घर सोडावं लागलं, तर तू काय करशील? कसं जगशील? तू लिहू शकतोस ते ठीक आहे. पण आज कुत्रं पण नाही विचारात रे ह्या गोष्टीला. अशी एखादी गोष्ट आहे का की ती करून तू निदान दोन वेळेचं जेवण जेवू शकशील?" मी ह्याच्यावर फक्त हसलो. कारण हसण्याशिवाय त्या क्षणाला माझ्याकडे करण्यासारखं; खरं तर बोलण्यासारखं काहीच नव्हतं. हसलो की तो पुढे काहीच विचारणार नाही हे मला माहित होतं. अशीच टिंगल टवाळी करून आम्ही तिथून बाहेर पडलो. नंतर मी आणि नताली मेकडीज मध्ये गप्पा मारत बसलो.
तेव्हा नताली मला पैसे कमावण्याच्या विविध मार्गांविषयी सांगत होती. ती तिच्या भविष्याचा विचार करून आत्तापासून काही ना काही करून पैसे कमावतेय. मला नतालीचं जाम कौतुक वाटतं. आणि जेव्हा मी असं काही ऐकतो तेव्हा मी स्वतःला त्या 'वेक अप सिद' मधल्या रणबीर कपूरशी कम्पेअर करतो. त्याच्यासारखा सेक्सी नसलो तरी त्याच्यासारखाच आई-बाबांच्या पैसारूपी खतावर वाढणारं मी एक बांडगूळ आहे हे मात्र अगदी खरं!
पण खरच मी आज जर घरातून बाहेर पडलो तर मी आज काय करेन? मी कसा पैसा कमावेन? मी आर्टिकल्स लिहीन? तसे तर ह्या जगात लाखो लोक माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मस्त लिहितात. मी म्हणजे 'किस झाड की पत्ति!' त्यामुळे लिहिणं गेलंच. मी फोटो काढेन? छे! एक एस. एल. आर. आहे म्हणून मी काही 'केविन कार्टर' होऊ शकत नाही. मी भाषणं देईन? ते काही प्रमाणात जमेलही, पण मला ऐकणार कोण? मी आज काय करू शकेन? मला खरच काही माहित नाही! ह्याचं उत्तर आज माझ्याकडे नाही. 'मी कोण?' हेच मला माहित नाही. मी जगतोय कारण मला जगवलं जातंय. माझा अस्तित्व काय? माझे आई बाबा? पण ते तर मला एक दिवस सोडून जाणारच! मग मी कोण? आज माझ्याकडे असं काय आहे ज्याचा मी पुरेपूर उपयोग करेन? आज माझ्याकडे अशी कोणती गोष्ट आहे जी मला भाकरी मिळवून देईल? मी जे काही शिकतोय त्याचा मी कितीसा उपयोग करतोय? मला खरच काही माहित नाही! माझा एच. ओ. डी. सुधाकर नेहमी म्हणतो "what will the world lose if you die at this moment???" खरंच! आज मी गेलो तर हे जग माझ्यासाठी रडेल? की 'ठीक आहे! गेला बिचारा!' हे म्हणून शांत बसेल? माझ्यापेक्षा कमी शिकलेले लोक जेव्हा माझ्या पुढे जातील, तेव्हा मी काय करेन? मी हा धक्का पचवू शकेन?
माझ्याकडे आज ह्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. मात्र एक गोष्ट समजली की 'मी कोणीच नाही!!!'